बेळगाव ( प्रतिनिधी) बेळगाव तालुक्यातील सावगाव आणि बाची येथे मराठी शाळांच्या परिसरातच कन्नड शाळा सुरू होणार आहेत, तर खानापूर तालुक्यातील काटगाळी, बिदरभावी, राजवाळ-गवळीवाडा, हणबरवाडा आणि शिरोलीवाडा या मराठीबहुल गावांमध्येही अशाच प्रकारे कन्नड शाळांना परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व ठिकाणी केवळ एक-दोन कुटुंबांच्या मागणीचा आधार घेऊन हा निर्णय घेतल्याने मराठी समाजात संतापाची लाट उसळली आहे.
सीमाभागातील मराठमोळ्या गावांत मुद्दाम कानडी शाळा सुरू करून ‘कानडीकरण’ वाढविण्याचा हा कारस्थानयुक्त डाव मराठी समाजाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न असल्याचा संताप मराठी बांधवांतून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सावगाव ग्रामस्थांनी या निर्णयाला ठाम विरोध दर्शविला आहे. गावातील मराठी शाळेतच कन्नड शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयास ग्रामस्थांनी विरोध करत, हवं तर गावात इतरत्र कन्नड शाळा उभारावी पण मराठी शाळेत वेगळी कन्नड शाळा भरवू नये, अशी मागणी केली आहे.
गावातील मराठी शाळा गळक्या वर्गखोल्या, अपुरे शिक्षक आणि जागेअभावी सध्या संघर्ष करत असताना, त्यातच कन्नड शाळा सुरू केल्यास मराठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम होईल, असा इशारा शाळा सुधारणा समितीने दिला आहे.
शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर सावागावंकर, उपाध्यक्षा मेघा शटवाई, विनोद पाटील, कल्लप्पा पाटील, मारुती चौगुले, ओमाना हिंडलगेकर, मल्लाप्पा देसुरकर, सुजाता काकतकर, निकिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणपत पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, श्रीकांत बाणेकर तसेच कलमेश्वर हायस्कूल शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मारुती पाटील, सदस्य सुधा कोरजकर, मालू काकतकर, वैजंता गुरव, पूजा काकतकर, आनंदी घाटेगस्ती, रेश्मा शटवाई आदींनी संयुक्त बैठक घेऊन शासनाच्या आदेशाचा निषेध केला.
बैठकीत या निर्णयाविरोधात ठराव एकमताने पास करण्यात आला असून, तो बीईओ कार्यालयाला सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावगाव ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा प्रयत्न हा मराठी शिक्षणावर आघात असून, त्यास कुठल्याही परिस्थितीत मान्यता दिली जाणार नाही.
#Belgav #BedhadakBelgav
