भाषा टिकविण्यात पत्रकारांचे योगदान मोठे: सार्वजनिक वाचनालय तर्फे चर्चासत्र संपन्न
बेळगाव – “वृत्तपत्रे म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज होय. भाषा टिकविण्याचे आणि वाढविण्याचे कार्य करण्यामध्ये वृत्तपत्रांचे योगदान मोठे आहे” असा सूर शुक्रवारी सायंकाळी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित चर्चासत्रात उमटला.
सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित अभिजात मराठी भाषा गौरव दिन आणि अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताह यांचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड व सहकारी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व प्रास्ताविक करून उपस्थित पत्रकार व रसिकांचे स्वागत केले.
सप्ताहाचे उद्घाटन मराठी भाषेच्या अभिवृद्धीत पत्रकारांचे योगदान या विषयावर झालेल्या चर्चासत्राद्वारे करण्यात आले. चर्चासत्रात सहभागी झालेले वक्ते होते – दैनिक तरुण भारतचे सुशांत कुरंगी, दैनिक पुढारीचे शिवाजी शिंदे, दैनिक सकाळचे मलीकार्जुन मुगळी, दैनिक रणझुंजारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर, बेधडक बेळगावचे पियुष हावळ आणि विलास बेळगावकर.
चर्चासत्रात शिवाजी शिंदे यांनी म्हटले की, “वृत्तपत्रांनी जीवनाशी निगडित विषय मांडले असल्याने आणि समस्यांची मांडणी वृत्तपत्रांत होत असल्याने सामान्यांचा आवाज म्हणजे पत्रकार.”
मलीकार्जुन मुगळी यांनी माहिती दिली की सकाळने मराठी साहित्यिकांचा आणि बोलीभाषांचा परिचय करून देण्याचे कार्य सातत्याने केले आहे
पियुष हावळ म्हणाले, “मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. संतांनी वाढविलेली ही भाषा जगभर पसरली आहे. मराठीभाषेमध्ये वैश्विक भाषा होण्याचे सामर्थ्य आहे.तिला जोपासण्याचे काम वृत्तपत्रे आणि आत्ता सोशल मीडिया करीत आहेत.”
सुशांत कुरंगी म्हणाले, “मराठी भाषा टिकविण्याचे काम स्वर्गीय बाबुराव ठाकूर यांनी सुरू केले, ते किरण ठाकूर आणि आता प्रसाद ठाकूर हे तरुण भारतातून अव्याहतपणे करीत आहेत.”
मनोहर कालकुंद्रीकर यांनी सांगितले की दैनिक रणझुंजार खेड्यापाड्यात ग्रंथालय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
विलास बेळगावकर यांनी सांगितले, “सीमा लढा टिकवण्याचे काम वृत्तपत्रांनीच केले आहे.”
चर्चासत्राचा समारोप बसवंत शहापूरकर यांनी कविता वाचनाने केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास वाचनालयाचे संचालक आय. जी. मुचंडी, अभय याळगी, रघुनाथ बांडगी, लता पाटील आणि प्रसन्न हेरेकर यांच्यासह निमंत्रित व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी सायंकाळी पाच वाजता आरपीडी महाविद्यालयाचे प्रा. महादेव खोत “मराठी भाषा व संस्कृती” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. वाचनालयाने रसिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
