बेळगाव (प्रतिनिधी) :
गणेशपूर येथील सरस्वतीनगरच्या प्रवेशद्वाराजवळ गटारीवरील स्लॅब फूटल्याने त्यातील लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला असून, अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी त्या ठिकाणी मातीचा कुंडा ठेवून धोका असल्याची सूचना दिली आहे.
या ठिकाणावरून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. सरस्वतीनगर, महालक्ष्मीनगर, ए.डब्ल्यू.डब्ल्यू.ए. क्वार्टर्स, अंगडी कॉलेज आदी भागांमध्ये जाण्यासाठी हा मुख्य मार्ग असल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांची सतत ये-जा सुरू असते. संबंधित भाग बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून, तो विजय नगर आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्राच्या सीमेलगत आहे. पोलिस अधिकारक्षेत्राच्या दृष्टीने हे ठिकाण कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते.
स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना या धोकादायक स्थितीची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी तातडीने गटारीवरील स्लॅबची दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी केली आहे.
संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक दुरुस्तीची कामे करावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
