“मराठी भाषेचा प्रवास म्हणजे सांस्कृतिक समृद्धीचा इतिहास” — बजरंग धामनेकर

“मराठी भाषेचा प्रवास म्हणजे सांस्कृतिक समृद्धीचा इतिहास” — बजरंग धामनेकर

बेळगाव – “मराठी भाषेला महान परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, हेमाद्री पंडित, चक्रधर स्वामी, सावता माळी, संत तुकाराम, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मोरोपंत, श्रीधर स्वामी या थोर विभूतींच्या योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे,” असे प्रतिपादन बाल शिवाजी वाचनालयाचे संचालक बजरंग धामनेकर यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित “अभिजात मराठी भाषा सप्ताह” अंतर्गत तिसऱ्या दिवशी “मराठी भाषेचा प्रवास” या विषयावर ते बोलत होते.

धामनेकर पुढे म्हणाले, “मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी अनेकांनी त्याग आणि परिश्रम केले. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आजच्या काळापर्यंत मराठीची थोरवी गाताना कोणीच कमी पडले नाही. मराठी ही सर्वसमावेशक, सर्व क्षेत्रांना व्यापणारी आणि उदात्त धोरण असलेली भाषा आहे. इतर भाषांतील अनेक शब्दांना मराठीने सामावून घेतले असून त्यामुळे ती अधिक प्रगल्भ झाली आहे.”

लीळाचरित्र, विवेकसिंधू या ग्रंथांच्या माध्यमातून मराठी भाषेला मिळालेले योगदान त्यांनी स्पष्ट केले. वारकरी संप्रदाय, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून मराठीचा प्रसार झाला, असेही त्यांनी सांगितले. “भोसले घराण्याने केवळ तलवारच चालवली नाही तर मराठी साहित्याची मोठी सेवा केली,” असे नमूद करत त्यांनी पुढे होनाजी बाळा, शाहीर, बखरकार, वृत्तपत्रे आणि सामाजिक नाटके यांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या वृद्धीचा मागोवा घेतला. “बेळगावकरांनी विविध क्षेत्रात दिलेली माणसे हीही मराठीच्या वाढीस कारणीभूत ठरली,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यवाह सुनिता मोहिते यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष अनंत लाड यांनी धामनेकर यांचा परिचय करून सन्मान केला, तर उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी नेताजी जाधव, इतर संचालक, कर्मचारी आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमवारचा कार्यक्रम:
सोमवारी सायंकाळी पाच वाजता हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्रा. संदीप मुंगारे हे “मराठी साहित्य” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × one =

error: Content is protected !!