बेळगांव येथील जुना पी.बी. रोड, पाटील गल्ली येथे संत रोहिदास महाराज चर्मकार युवक संघाच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सहाय्यक आयुक्त कल्याणी व्यंकटेश कांबळे यांच्या शुभहस्ते हे फोटो पूजन संपन्न झाले.
यानंतर पालखी आरती, भजन व कीर्तनाच्या माध्यमातून टाळ–मृदुंगाच्या गजरात प्रमुख रस्त्यांवरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन श्रद्धेने सहभाग दर्शविला.
दुपारच्या सत्रात भजन व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वॉर्ड क्रमांक २१ च्या नगरसेविका प्रीती कामकर, समाजसेवक विनायक कामकर तसेच समाजातील इतर मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. खासबाग व शहरातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक मंडळ व महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले. संत रोहिदास महाराज चर्मकार युवक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, सचिव शंकर कांबळे, खजिनदार तुकाराम आप्पा शिंदे, उपाध्यक्ष राजू कांबळे यांच्यासह शंकर नार्वेकर, शंकर शिंदे, मारुती कांबळे, मनीश्वर जाधव, शिवपुत्र सांगली, सुरेश कांबळे, गजानन नांगरे, नंदू शिंगणापूर व शिवाजी कांबळे यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.
