कावल्याबावल्या खिंडीत सांदोशी येथे शौर्यदिन उत्साहात संपन्न; वीर जिवाजी सर्कले यांच्या पराक्रमाला अभिवादन

कावल्याबावल्या खिंडीत सांदोशी येथे शौर्यदिन उत्साहात संपन्न; वीर जिवाजी सर्कले यांच्या पराक्रमाला अभिवादन

खिंडीत आजही “हर हर महादेव”च्या गर्जना आणि ढाली-तलवारींचा खणखणाट ऐकू येतो, अशी रोमांचक अनुभूती देणारा सांदोशी शौर्यदिन यंदा दहाव्या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या उत्तरेस असलेल्या कावल्याबावल्या खिंडीत वीर जिवाजी सर्कले नाईक आणि सरदार गोदाजी जगताप यांच्या अतुलनीय शौर्याची स्मृती जागविण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे सर्कले नाईक परिवार आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सांदोशी गावातील वीरगळ पूजन, ग्रामदेवता पूजन तसेच कोकणदिव्याच्या पायथ्याशी खिंडीत दुर्गवीर टीमकडून अभिवादन करण्यात आले. विठ्ठल केंबळे, सातारा येथील अमित बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या अभिवादनात सहभाग घेतला.

इतिहासातील रक्तरंजित लढाईची आठवण यावेळी पुन्हा जागवण्यात आली. कावल्याबावल्या खिंडीत झालेल्या युद्धात सांदोशीचे सुपुत्र वीर जिवाजी सर्कले नाईक यांनी मोगल सरदार शहाबुद्दीन खानाच्या हजारोच्या सैन्याला रोखत वीरमरण पत्करले. त्याचवेळी हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज रायगडाहून निसटून यशस्वीपणे जिंजीला पोहोचले.

या प्रसंगी ॲड. आकाश भोंडवे पाटील यांनी आपल्या मनोगतात वीर जिवाजी सर्कले यांच्या पराक्रमाची योग्य दखल इतिहासाने घेतली नसली तरी भविष्यात ही शौर्यगाथा घराघरात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच बालशिवव्याख्याती वृंदा सर्कले आणि दुर्गरक्षक फोर्सचे जयकांत शिंक्रे यांनीही प्रभावी व्याख्याने दिली.

या सोहळ्यास महेशस्वामी जंगम, दुर्गवीर प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष हसुरकर, जिजामाता विद्यालय कोंझरचे मुख्याध्यापक इनामदार, छत्रपती शंभूचरित्र ग्रंथलेखक सुशांत उदावंत, अनंत यादव, डॉ. शीतल मालुसरे, योगेश देवगिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन प्रदीप सर्कले, गणेश सर्कले, निलेश सर्कले, आकाश सर्कले, संदीप सर्कले, कैलास सर्कले, अजय सर्कले, नारायण सर्कले, जितेश सर्कले, प्रमोद सर्कले आणि मधुकर सर्कले यांनी केले. सूत्रसंचालन इतिहास अभ्यासक रामजी कदम यांनी केले. 🚩

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + 5 =

error: Content is protected !!