बेळगाव, दि. — : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयातर्फे जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी उद्यान येथे प्राचार्य राजू हलब यांच्या हस्ते विधिवत पूजन करून झाली.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषात डॉ. टी. एम. नौकुडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थींनी शिवाजी उद्यानापासून राजहंस गडापर्यंत धावत ‘शिवज्योत’ नेली. गडाच्या पायथ्यापासून चढाई करत प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी गडावर पोहोचून महाराजांना मानवंदना दिली.
यावेळी प्राचार्य राजू हलब म्हणाले की, महाराजांचे जीवन धैर्य, समानता, स्त्री सन्मान आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे. त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण करून आदर्श घालून दिला. गनिमी कावा, रणनीती आणि गडांचे महत्त्व यामुळे त्यांनी बलाढ्य शत्रूवरही मात केली. आजच्या तरुणांनी शिवचरित्र केवळ वाचू नये, तर ते आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
सागर बी. एड्.च्या प्रशिक्षणार्थींनीही महाराजांविषयीचे विचार व्यक्त केले. स्फूर्तीगीते सादर करण्यात आली तसेच जयघोषांनी परिसर दणाणून सोडला. या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
