बेळगाव : आर. पी. डी. पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या क्रीडा उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी एस. के. ई. संस्थेच्या आर. पी. डी. पदवीपूर्व महाविद्यालयाच्या चेअरपर्सन धनश्री आजगावकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी प्राचार्या तृप्ती शिंदे, प्रा. मंजुनाथ दोड्डमणी, क्रीडा शिक्षक व संचालक आनंद रत्नाप्पागोळ यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून करण्यात आली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. राज्यस्तरीय खेळाडूंनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून ती मान्यवरांकडे सुपूर्द केली. त्यानंतर निधी चचडी या विद्यार्थिनीने सर्व खेळाडूंना क्रीडाशपथ दिली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना धनश्री आजगावकर यांनी अभ्यासासोबतच खेळालाही तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले. शरीर तंदुरुस्त व सुदृढ ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे खेळात सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चार्मीन फर्नांडिस यांनी केले. क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली क्रीडावृत्ती व शिस्त दाखवून दिली.
