शाहूनगर येथे रोशनी मुळीक हिचा भव्य सत्कार; बीएसएफ शपथग्रहण समारंभात ‘बेस्ट परेड कमांडर’चा मान

शाहूनगर येथे रोशनी मुळीक हिचा भव्य सत्कार; बीएसएफ शपथग्रहण समारंभात ‘बेस्ट परेड कमांडर’चा मान

सिलिगुडी (पश्चिम बंगाल) येथे ३१ जानेवारी रोजी पार पडलेल्या बीएसएफ शपथग्रहण समारंभात खानापूर तालुक्यातील ओलमनी गावची आणि सध्या शाहूनगर, कंग्राळी बी.के. येथे वास्तव्यास असलेली कु. रोशनी वसंत मुळीक हिने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल ४०० मुलामुलींमधून तिला परेड कमांडर म्हणून नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला.

या शपथग्रहण समारंभात रोशनीला ‘बेस्ट परेड कमांडर’ तसेच ‘बेस्ट ड्रिल’ हे मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिस्त, आत्मविश्वास आणि प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर तिने नारी शक्तीचा दमदार आवाज संपूर्ण मैदानात घुमविला. तिच्या या यशामुळे सीमाभागासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीनिमित्त मुळीक कुटुंबीयांच्या वतीने शाहूनगर येथील वसुंधरा मंगल कार्यालयात रोशनीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, कंग्राळी बी.के. ग्रामपंचायतीचे सदस्य जयराम पाटील, जोतिबा शहापुरकर, बाबू पावशे तसेच रोशनीचे प्रशिक्षक प्रशांत शहापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रोशनीचे वडील वसंत मुळीक आणि आई वैष्णवी मुळीक यांच्या हस्ते तसेच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत तिला शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोशनी मुळीक हिच्या या यशामुळे सीमाभागातील तरुणाईला नवी प्रेरणा मिळाली असून तिच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + eight =

error: Content is protected !!