संजीवनी फाउंडेशनमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

संजीवनी फाउंडेशनमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बेळगाव :
संजीवनी फाउंडेशनच्या आदर्श नगर येथील काळजी केंद्रात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, ओरिओनिस प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे सीईओ टी. आर. पालकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणत देशप्रेमाची भावना व्यक्त केली. कार्यक्रमास संजीवनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे तसेच संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. चेअरमन मदन बामणे यांनी टी. आर. पालकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे टी. आर. पालकर यांनी, भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे हीच प्रजासत्ताक दिनाची खरी भावना असल्याचे सांगितले. समाजातील दुर्बल घटकांच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे योगदान राष्ट्रउभारणीत अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यानंतर चेअरमन मदन बामणे यांनी आपल्या भाषणात, संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून मानवसेवा, आरोग्यसेवा तसेच काळजी केंद्रातील रुग्णांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. समाजाप्रती आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हेच खरे देशभक्तीचे रूप असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी काळजी केंद्रातील रुग्णांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास डॉ. सुरेखा पोटे, विद्या सरनोबत, पद्मा औषेकर, पुष्पा बेंडवाड, सुनील चन्नदासर, अर्चना शिरहट्टी, सावित्री माळी, अक्षता अक्कोळे, संजीवनी पोतदार, कावेरी लमानी, गुरुराज हडपद, कावेरी नेगी, विजयालक्ष्मी पाटील यांच्यासह काळजी केंद्रातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसम्मा बेनकट्टी यांनी केले तर सरिता सिद्दी यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − six =

error: Content is protected !!