बेळगाव – शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या रंगुबाई पॅलेस इमारतीची तातडीने निगा राखणे गरजेचे असल्याची मागणी पुढे येत आहे. या इमारतीवर सध्या अनेक झाडे आणि झुडपे वाढली असून, त्यामुळे इमारतीच्या संरचनेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
रंगुबाई पॅलेस हे बेळगावचे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतीक मानले जाते. सध्या या इमारतीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहर कार्यालय तसेच एक शाळा कार्यरत आहे. दररोज विद्यार्थ्यांची व नागरिकांची वर्दळ असणाऱ्या या ठिकाणी इमारतीची दुरवस्था आणि वाढलेली झाडे ही गंभीर बाब ठरत आहे.
इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या इमारतीचे वैभव अबाधित ठेवण्यासाठी, वाढलेली झाडे व झुडपे तातडीने काढून इमारतीची योग्य देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. संबंधितांनी यात लक्ष घालून रंगुबाई पॅलेसचा ऐतिहासिक वारसा जपावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
