विजयापुरा : रेड बर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाने (Trainer Aircraft) विजयापुरा जिल्ह्यातील बाबळेश्वर तालुक्यातील मंगळूरू गावाजवळ शेतजमिनीत आपत्कालीन लँडिंग केले. या विमानात कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम शंकर हे दोघे उपस्थित होते. ते कलबुर्गीहून बेळगावकडे उड्डाण करत असताना ही घटना घडली.
आपत्कालीन लँडिंगदरम्यान विमानाचे नुकसान झाले असून दोन्ही वैमानिक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्राथमिक माहितीनुसार इंधन टंचाईमुळे (fuel shortage) ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच बाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.
