बेळगाव, ३१ जुलै – कर्नाटक सरकारकडून बेळगावात कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत असून, मराठी भाषेला डावलले जात आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी स्पष्ट मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी काल मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.
वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत साळुंखे यांनी बेळगाव महापालिकेत पूर्वी त्रिभाषा सूत्रांतर्गत मराठी, इंग्रजी आणि कन्नड भाषेचा वापर करण्यात येत होता, पण आता केवळ कन्नड भाषाच वापरली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. मराठी भाषकांच्या हक्कांवर गदा येत असून, सरकारी परिपत्रकांतून मराठी पूर्णतः वगळली जात आहे. इतकेच नव्हे तर मराठी भाषिक अधिकाऱ्यांनाही सक्तीने कन्नड वापरण्यास भाग पाडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“आम्हाला कन्नड भाषेविषयी विरोध नाही, पण मराठी भाषेला डावलणे ही गोष्ट आम्ही कधीही सहन करणार नाही,” असे ठाम मत साळुंखे यांनी व्यक्त केले. त्यांनी यावेळी भाषिक अल्पसंख्याक कायद्याच्या तरतुदी, कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश, आणि भाषिक अल्पसंख्याक आयोगाने घेतलेली दखल यासंबंधीची माहितीही उपमुख्यमंत्र्यांना दिली व त्याबाबतची संबंधित कागदपत्रे सुपूर्त केली.
या मुद्द्यावर फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “मी स्वतः या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालणार असून, गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेईन. सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांवर होणारी कन्नड सक्ती सहन केली जाणार नाही. याविरोधात आम्ही ठोस भूमिका घेऊ,” असे आश्वासन दिले.