बेळगाव – सीमाभागातील मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्यांक कायद्याचे सर्वाधिकार मिळावेत यासाठी 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने धर्मवीर संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्याची परवानगी मागितली होती. मात्र, प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था तसेच सणासुदीचे कारण पुढे करत शहरातील शांतता बिघडू शकते या कारणावरून परवानगी फेटाळली.
पण आज, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या केवळ काही मोजक्या कार्यकर्त्यांनी चन्नमा चौकातून निदर्शने करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आश्चर्य म्हणजे, यावेळी त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध, अटक किंवा कारवाई करण्यात आली नाही.
या घटनेतून प्रशासनाचा उघड दुट्टेपणा आणि मराठी संघटना बाबतचा भेदभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मराठी जनतेच्या हक्कासाठी शांततेत मोर्चा काढण्यास परवानगी नाकारणारे प्रशासन, कर्नाटक संघटनांना मात्र मोकळीक देत असल्याची संतापजनक परिस्थिती आज समोर आली आहे.