बेळगाव जिल्ह्यात ६ नव्या मतदारसंघांची शक्यता; २०२८ मध्ये मोठे राजकीय बदल घडणार
बेळगाव : राज्याच्या राजकारणात सर्वाधिक प्रभावशाली मानला जाणारा बेळगाव जिल्हा आता आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. २०२८ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची चिन्हे दिसत असून, विद्यमान १८ मतदारसंघांव्यतिरिक्त आणखी सहा मतदारसंघ वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतदारसंघांच्या पुनर्विभाजनाचे काम अंतिम टप्प्यात असून, जिल्ह्यातील मतदारसंघांची संख्या २४ होण्याची शक्यता आहे. या सहा मतदारसंघांच्या वाढीमुळे बेळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून, अनेक विद्यमान आमदारांना नव्या मतदारसंघांचा सामना करावा लागू शकतो.
कर्नाटकाच्या राजकारणात बेळगाव जिल्ह्याचे स्थान नेहमीच भक्कम राहिले आहे. मतदारसंघांची संख्या, नेत्यांची ताकद आणि राजकीय सक्रियता या सर्व बाबतीत जिल्हा आघाडीवर आहे. त्यामुळे कोणताही पक्ष बेळगावला हलक्यात घेत नाही.
या नव्या बदलांसोबतच महिलांसाठीचे आरक्षण पुढील निवडणुकीतच लागू होणार आहे. त्यामुळे महिलांना आठ जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्या बेळगाव ग्रामीण आणि निपाणी या दोनच मतदारसंघांत महिला आमदार आहेत. त्यामुळे नव्या सहा मतदारसंघांसह नव्या महिला चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार आहे.
नवीन मतदारसंघ रचनेमुळे अनेक विद्यमान आमदारांचे मतदारसंघ बदलू शकतात. जुन्या मतदारांना गमावून नव्या मतदारांशी सामना करण्याची वेळ अनेकांवर येईल. काहींना महिलांच्या आरक्षणामुळे आपला मतदारसंघ गमवावा लागण्याची शक्यता आहे.
ही घडामोड केवळ बेळगावपुरती मर्यादित राहणार नाही, तर राज्यभरातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणार आहे. महिला नेतृत्वासाठी ही निवडणूक एकाचवेळी मोठी संधी आणि आव्हान ठरणार आहे.
एकूणच, २४ मतदारसंघांसह बेळगाव जिल्हा २०२८ च्या निवडणुकीत कर्नाटकाच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरणार, अशी सर्व लक्षणे दिसत आहेत.
