बेळगाव :
बेळगाव–वेंगुर्ला रोडवर असलेल्या उचगाव येथील श्री गणेश मार्कंडेय तीर्थक्षेत्रातील मंदिरासमोरील नव्या सभामंडपाचे पूजन समारंभ नुकताच भक्तिभावात पार पडला. उचगाव ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे आणि काँग्रेसचे नेते जयवंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते हा पूजन सोहळा संपन्न झाला.
गणेश जयंतीचे औचित्य साधून मंदिर रंगरंगोटी, समोरील पेवर्स बसविणे तसेच सभामंडप उभारणीसह विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून या कामांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त सभामंडपाच्या कॉलमचे विधीवत पूजन करण्यात आले.
यावेळी उचगाव ग्रामपंचायतीचे सदस्य यादो कांबळे, मोनाप्पा पाटील, पुंडलिक मोरे, सुबाव अर्जुनवाडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री गणेशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बाळकृष्ण तेरसे व जयवंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते सभामंडपाच्या कॉलमचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना जयवंत बाळेकुंद्री म्हणाले की, हे जागृत गणेश देवस्थान असून दरवर्षी हजारो भाविक येथे श्री गणेशाचे दर्शन घेतात. नवसाला पावणारा सिद्धिविनायक म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. सर्व भाविकांच्या श्रद्धा व सहकार्यामुळे मंदिराच्या विकासासाठी हे उपक्रम हाती घेण्यात आले असून समितीने केलेल्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
बाळकृष्ण तेरसे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी गणेश मंदिर असून जन्मदर कमिटीच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. मंदिराची देखभाल समितीच्या माध्यमातून योग्य प्रकारे होत असून भाविकांच्या उदार सहकार्यामुळे ही कामे पूर्णत्वास जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी कमिटीचे मधु बेळगावकर, अशोक चौगुले, पुंडलिक पावशे, भास्कर कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक चौगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन पुंडलिक पावशे यांनी केले.
