बेळगाव : पोलीस आयुक्त भुषण बोरसे यांनी नुकतीच चव्हाट गल्ली येथील बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन गणपती बाप्पाच्या उत्सवाची तयारी व मंडपाची पाहणी केली. यावेळी मंडळाच्या प्रतिनिधींशी उत्सवाचे सुरक्षित व सुरळीत आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील जाधव यांनी आयुक्तांचे स्वागत केले. त्यानंतर आयुक्त बोरसे म्हणाले, “बेळगाव जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. सर्वांनी हा उत्सव साजरा करावा, मात्र कायद्याचे व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, बेळगाव शहरातील तसेच इतर ठिकाणच्या मंडपांना हजारो भाविक भेट देतात. त्यामुळे शांतता व सुरक्षिततेचा विचार करून पोलिस प्रशासनाने विशेष नियोजन आखले असून, यंदाचा उत्सव निर्विघ्न व आनंदमय होण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.
सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ झालेल्या या चर्चेत आयुक्तांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील जाधव यांनी आश्वासन दिले की, “कर्नाटक सरकारच्या सर्व आदेशांचे व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन मंडळाकडून केले जाईल. कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ.”
या प्रसंगी प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, मंडळ अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव, विनायक पवार, अभिषेक नाईक, सत्यम नाईक, वृषभ मोहिते, भरत काळगे, शिवजयंती उत्सव मंडळ अध्यक्ष अनंत बामणे, सरचिटणीस रोहन जाधव, सौरभ पवार, हर्षल नाईक, महिंद्र पवार, निखील पाटील, रोहन जाधव, संदीप कामुले, राहुल जाधव, संजय रेडेकर, विशाल मूचंडी, उमेश मेणसे यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.