बैलहोंगल: उसने घेतलेले दोन हजार रुपये परत न केल्याच्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना बैलहोंगल तालुक्यातील गिरीयाळ गावात घडली आहे.
गिरीयाळ येथील मंजुनाथ गौडर (वय 30) हा मृत तरुण असून, त्याचा मित्र दयानंद गुंडलूर याने त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात दयानंदने मंजुनाथला दोन हजार रुपये उसने दिले होते. आठवड्याभरात पैसे परत देण्याचे आश्वासन मंजुनाथने दिले होते. मात्र मुदत संपल्यानंतर दयानंदने पैसे मागितल्याने दोघांमध्ये तीव्र वाद झाला.
वाद चिघळत जाऊन संतापाच्या भरात दयानंदने कोयत्याने वार करून मंजुनाथचा खून केला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्याआधीच मंजुनाथचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आरोपी दयानंद गुंडलूर स्वतःहून पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केला आहे. या घटनेने गिरीयाळ गावात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
