बेळगाव – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ११ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. श्री धर्मवीर संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार होता. परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, वाहतूक कोंडी व नागरिकांच्या सुरक्षिततेचे कारण देत कर्नाटक पोलीस अधिनियम १९६३ अंतर्गत ही परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, मोर्चा काढण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास परवानगी देण्यात आली असून, पोलीस विभागाकडून त्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, असे आदेशात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वाची बैठक रविवार, दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार श्री. मनोहर किनेकर यांनी केले आहे.