पाटील गल्लीतील मराठी फलक हटविण्याचा पुन्हा प्रयत्न – पोलिसांनी समाजकंटकांना हुसकावले, सोशल मिडियावरील भडकवणाऱ्यांवर कारवाई होणार का?

पाटील गल्लीतील मराठी फलक हटविण्याचा पुन्हा प्रयत्न – पोलिसांनी समाजकंटकांना हुसकावले, सोशल मिडियावरील भडकवणाऱ्यांवर कारवाई होणार का?

बेळगाव, २ ऑगस्ट:
पाटील गल्ली येथील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकावर समाजकंटकांनी पुन्हा एकदा आक्षेप घेत, तो हटविण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लाल-पिवळ्या कापडाने स्वतःला बांधलेले दोन युवक आणि एक महिला सकाळच्या सुमारास या फलकाजवळ आले आणि तो फलक खाली उतरविण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, परिसरातील सजग नागरिक आणि तैनात असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना तात्काळ हुसकावून लावण्यात आले.

या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी वेळेवर हस्तक्षेप करत पोलिसांना माहिती दिली आणि एक मोठा अनुचित प्रकार टळला. परंतु, या साऱ्या प्रकारामागे कोणाची उत्तेजन देण्याची भूमिका होती? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरतो आहे. संबंधित समाजकंटकांना भडकविण्यासाठी काही समाजमाध्यमांवरील खाती सातत्याने मराठी विरोधी संदेश प्रसारित करत असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक सणात समाजकंटकांचा हस्तक्षेप, शांतताप्रिय नागरिकांच्या भावना दुखावणारा ठरत आहे. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलिसांनी आजच्या घटनेत त्वरेने कारवाई केली असली तरी या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाणार का? आणि त्यांच्या पाठीमागे कार्यरत असलेल्या सोशल मीडियावरील भडकवणाऱ्या खात्यांविरोधात सायबर गुन्हे शाखा काही पावले उचलणार का? असे सवाल आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत.

शहरातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 5 =

error: Content is protected !!