मराठी विद्यानिकेतनमध्ये पालक संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

मराठी विद्यानिकेतनमध्ये पालक संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पालक संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला. दिनांक २९ व ३० जानेवारी रोजी शाळेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोळकर आणि पुण्याच्या प्रसिद्ध सायबर पत्रकार व समुपदेशक डॉ. मुक्ता चैतन्य यांच्या व्याख्यानांचे व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी डॉ. हमीद दाभोळकर यांनी ‘विवेकी पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. पालकांनी विद्यार्थ्यांशी कशा प्रकारे सुसंवाद साधावा, बदलती जीवनशैली, माध्यमांचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम, मुलांची मानसिकता तसेच मन व मेंदूचा विकास या विविध विषयांवर त्यांनी सखोल मांडणी केली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी डॉ. हमीद दाभोळकर यांची प्रकट मुलाखत नीला आपटे व इंद्रजित मोरे यांनी घेतली.

दुसऱ्या दिवशी डॉ. मुक्ता चैतन्य यांनी ‘आधुनिक जगातील डिजिटल आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले. मोबाईलचा वाढता वापर किती धोकादायक ठरू शकतो, सायबर फसवणूक कशी होते, मोबाईलचा मर्यादित वापर कसा करावा, योग्य स्क्रीन टाइम किती असावा तसेच सायबर गुन्हेगारीची ओळख यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी उपस्थितांना जागरूक केले.

या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांतून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे प्रभावी समुपदेशन झाले. या कार्यक्रमांना पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुभाष ओऊळकर होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, सचिव विक्रम पाटील, सहसचिव पी. पी. बेळगावकर, खजिनदार एन. बी. खांडेकर, विश्वस्त डॉ. विजय देसाई व प्रा. सुरेश पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बी. जी. पाटील, एन. सी. उडकेकर, शिक्षण समन्वयक नीला आपटे, सविता पवार, गौरी चौगुले, सीमा कंग्राळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. रुपाली हळदणकर, स्नेहल बेळगावकर, स्नेहल पोटे, मंजुषा पाटील, इंद्रजित मोरे व प्रसाद सावंत यांनी सूत्रसंचालन केले. आभार मुक्ता अलगोंडी व धीरज राजपूत यांनी मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × one =

error: Content is protected !!