खानापूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खानापूर तालुक्यातील प्रभुनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर झालेल्या भीषण दुचाकी अपघाताने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. या दुर्घटनेत खानापूर येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खानापूरमधील निंगापूर गल्ली येथील सुरज संजय कुंडेकर (वय २२) आणि दुर्गानगर येथील गणेश बुचडी (वय २३) हे दोघे घनिष्ठ मित्र ३१ डिसेंबरच्या रात्री जेवणासाठी बाहेर गेले होते. जेवणानंतर दुचाकीवरून खानापूरकडे परतत असताना प्रभुनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर दुचाकीवरील नियंत्रण अचानक सुटले.
नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या बाजूच्या संरक्षक कठड्याला जोरदार धडकली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दोघेही तरुण थेट उडून पुलाखालील सर्व्हिस रस्त्यावर कोसळले. या अपघातात सुरज कुंडेकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
त्याला तातडीने बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या गणेश बुचडी याला पुढील उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याचे सांगितले आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे खानापूर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
