बेळगाव / बेंगळुरू :
अंड्यांमध्ये कर्करोगकारक घटक आढळल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांनी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी व्यक्त केले.
सुवर्णसौध येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अलीकडे एका कंपनीच्या अंड्यांचा वापर करू नये, त्यामध्ये अँटिबायोटिक घटक असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
“अंडी ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे याबाबत कोणताही संभ्रम असल्यास त्याची शास्त्रीय तपासणी होणे आवश्यक आहे. संबंधित कंपनीच्या अंड्यांचे नमुने आधीच घेण्यात आले असून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर सर्व माहिती जनतेसमोर मांडली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
मंत्री गुंडुराव पुढे म्हणाले की, गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात १२५ अंड्यांचे नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी १२३ नमुने गुणवत्तेनुसार योग्य आढळले असून फक्त एक-दोन नमुन्यांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे अपूर्ण किंवा अप्रमाणित बातम्यांमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
“अंडी खाणे बंद करा, असे सांगण्याचा कोणताही प्रश्न नाही. सध्या संयम बाळगावा, तपास अहवाल येऊ द्यावा. त्यानंतर संबंधित कंपनीविरोधात काही ठोस निष्कर्ष आहेत का, हे स्पष्ट होईल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
