बेळगाव │ नेताजी नारायणराव जाधव यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री व विद्यमान आमदार जयंतराव पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर मालोजीराव अष्टेकर, दिगंबर पवार (खानापूरचे माजी आमदार), मनोहर किनेकर (बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार), बाळाराम पाटील,शिवाजी हंगीरगेकर, प्रभाकर भाकोजी ,अप्पासाहेब गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले. या प्रसंगी अनंत लाड, राजाराम सूर्यवंशी (बेकर्स असोसिएशन अध्यक्ष), प्रकाश अष्टेकर (नवहिंद सोसायटी अध्यक्ष), दीपक वाघेला (माजी नगरसेवक) आणि रणजीत चव्हाण पाटील (माजी नगरसेवक) यांनी नेताजी जाधव यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
माजी आमदार मनोहर किनेकर यांनी प्रमुख पाहुणे जयंतराव पाटील यांचा परिचय करून देताना सीमावासीयांची व्यथा मांडली. यावर प्रतिसाद देताना जयंतराव पाटील यांनी सीमाभागातील लोकांच्या भावना आणि संघर्ष यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टातील खटल्यात ताकद लावावी, अशी मागणी केली. त्यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरुद्ध तीव्र शब्दांत टीका करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करून सीमावासीयांवरील अन्याय थांबवावा, अशी विनंती करणार असल्याचे सांगितले.
तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून या प्रश्नावर चर्चा करून सीमाभागातील अन्याय रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्र आपल्या मागे आहे का अशी शंका घेऊ नका,” असा सल्ला त्यांनी सीमावासीयांना दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी आपल्या भाषणात जयंतराव पाटील हे सदैव सीमाभागातील लोकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत, असे सांगून सीमाप्रश्न सोडवण्यासाठी नियुक्त झालेल्या कायदेशीर तज्ज्ञांना आवश्यक पाठपुरवठा करावा, अशी मागणी केली. त्यांनी नेताजी जाधव यांच्या सहवासातील अनेक कार्यांची आठवण करून दिली आणि सीमालढ्याच्या शेवटपर्यंत एकत्र राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
उत्सवमूर्ती नेताजी नारायणराव जाधव यांनी आपल्या जीवनप्रवासातील सहकाऱ्यांचे आभार मानले आणि सीमालढ्यातील तसेच सामाजिक कार्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
या प्रसंगी जयंतराव पाटील यांचा सत्कार प्रकाश मरगाळे यांनी शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन केला. त्याचप्रमाणे जयंतराव पाटील यांनी नेताजी जाधव यांचा अमृत महोत्सव दिनानिमित्त गौरव केला. विशेष म्हणजे, नेताजी जाधव यांच्या मुलाने या दिवशी त्यांना कार भेट दिली, तसेच त्यांच्या घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमाला नेताजी जाधव संलग्न असणाऱ्या सर्व संघ ,संस्था, मंडळे यांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बेळगाव भागातील अनेक मान्यवर नेते मंडळी , कार्यकर्ते आणि त्यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाने या सोहळ्याची सांगता झाली.
(बेळगाव प्रतिनिधी — बेधडक बेळगाव)
