नंदगड : खानापूर तालुक्यातील नंदगड येथे तरुण मंडळ नंदगडतर्फे आयोजित ६६ वा दीपावली क्रीडा महोत्सव दिनांक २२ आणि २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार आहे. मागील ६५ वर्षांपासून दीपावलीच्या सुटीत हा क्रीडा महोत्सव सातत्याने आयोजित केला जात असून यावर्षीही भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी लक्ष्मी मंदिर नंदगड येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत महिला कबड्डी संघांना यावर्षी प्रथमच आमंत्रित करून सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ६५ किलो वजन गटात खुले कबड्डी सामने आणि खानापूर तालुका मर्यादित एक गाव-एक संघ खुले कबड्डी सामने घेण्यात येणार आहेत. हे सर्व सामने तीन विभागांमध्ये दिवसा खेळवले जाणार आहेत.
तरुण मंडळ नंदगडच्या परंपरेनुसार यावर्षीही सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रांत विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचा महोत्सवाच्या मंचावर सन्मान केला जाणार आहे.
या बैठकीला राजू पाटील, नागो पाटील, किरण पाटील यांच्यासह स्पर्धेचे पंच के. व्ही. पाटील, के. आर. पाटील, पी. आर. पाटील, दिलीप पाटील, सुभाष पाटील, सुहास पाटील, कृष्णा बिडकर, हनुमंत पाटील, रमेश पाटील, शंकर पाटील, कल्लप्पा पाटील, सतीश पाटील, राजू पाटील, ज्योतिबा एच. लशिकर, रामदास पाटील व लक्ष्मण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
