बेळगाव (प्रतिनिधी): बेळगाव जिल्हा ग्रामीण मर्यादित, महाविद्यालयीन टॉप–10 तसेच दिव्यांग गटासाठी आयोजित जयभारत क्लासिक – 2025 ही शरीर सौष्ठव स्पर्धा रामनाथ मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. स्पर्धेला ब्रिगेडियर हितेंद्र मराठे, कर्नल अर्पित थापा, दयानंद कदम, बसंनगौडा पाटील, प्रेमनाथ नाईक, किशोर गवस, रणजित किल्लेकर, गिरीश बरबर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत ग्रामीण गटातील 70, महाविद्यालयीन गटातील 35 आणि दिव्यांग गटातील 3 असे मिळून एकूण 108 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
ग्रामीण गटात खानापूर तालुक्यातील नागेश चोरलेकर याने उत्कृष्ट कामगिरी करून जयभारत क्लासिक – 2025 चा मानकरी हा किताब पटकावला. तसेच खानापूरच्याच सिद्धार्थ गावडे याला बेस्ट पोझर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाविद्यालयीन टॉप–10 स्पर्धेत गोमटेश कॉलेजचा विद्यार्थी ओमकार किशोर गवस मानकरी ठरला, तर ओम विजय पाटील याने बेस्ट पोझर किताब मिळवला.
दिव्यांग गटात गोकाक येथील मारी अवरागोळ मानकरी ठरला.
स्पर्धेचे पंच म्हणून राजेश लोहार, रणजित किल्लेकर, अनिल अंबरोळे, नागेंद्र मडीवाळ, विजय चौगुले, भारत बाळेकुंद्री, बाबू पावशे, सुनील बोकडे, श्रीधर बारटक्के, संतोष सुतार आणि नारायण चौगुले यांनी काम पाहिले. तर स्टेज मार्शल म्हणून दीपक कित्तुरकर, राजेश पाटील व सोमनाथ हलगेकर यांनी कार्यभार सांभाळला.
जयभारत क्लासिक 2025 स्पर्धेने बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण, महाविद्यालयीन आणि दिव्यांग खेळाडूंसाठी एक उत्तुंग व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
