बेळगाव :
बेळगाव जिल्ह्याचे आयएएस अधिकारी मोहम्मद रोशन, उपायुक्त (जिल्हाधिकारी) यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत खासदार धैर्यशील संभाजीराव माने यांनी लोकसभा अध्यक्ष मा. ओम बिरला यांच्याकडे लेखी तक्रार करत हक्कभंग दाखल केला आहे.
दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव परिसरातील मराठी भाषिक नागरिकांकडून ‘काळा दिवस’ पाळला जातो. १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार बेळगावसह ६५४ मराठी भाषिक गावे महाराष्ट्रातून तोडून तत्कालीन म्हैसूर (आताचे कर्नाटक) राज्यात समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ हा दिवस शांततेत पाळण्यात येतो.
खासदार धैर्यशील माने हे लोकसभा सदस्य असून महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या महाराष्ट्र–कर्नाटक सीमावाद कायदेशीर तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष देखील आहेत. १ नोव्हेंबर २०२५ रोजी ते महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जात असताना, बेळगावचे उपायुक्त आयएएस मोहम्मद रोशन यांनी तत्काळ नोटीस बजावून पोलीस यंत्रणेमार्फत त्यांना सीमा ओलांडण्यापासून रोखले, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
कोणताही गुन्हा दाखल नसताना तसेच कोणताही कायदेशीर आधार नसताना एका लोकप्रतिनिधीस एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यापासून रोखणे हे संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे खासदार माने यांनी म्हटले आहे. ही कारवाई अधिकारांचा गैरवापर असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून बेळगावचे उपायुक्त आयएएस मोहम्मद रोशन यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
