बेळगांव, ता. १८ —
काकतीवेस येथील मॉडर्न जिमच्या सभागृहात बेळगांव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने, मराठा युवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ६० व्या बेळगांव जिल्हास्तरीय ‘बेळगांव श्री’ व ‘बेळगांव हरक्युलीस’ शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या चषकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. ही प्रतिष्ठित स्पर्धा मंगळवार, ता. २७ जानेवारी रोजी मराठा मंदिरच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
यंदा या स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणारे आकर्षक चषक मॉडर्न जिमचे संचालक किरण कावळे व रितेश कावळे यांनी पुरस्कृत केले आहे. चषक अनावरण सोहळ्याला मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी मॉडर्न जिमचे संस्थापक किरण कावळे, बेळगांव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष एम. गंगाधर, दिनकर घोरपडे, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, हेमंत हावळ, शेखर जाणवेकर, सदानंद बडवाण्णाचे, क्रितेश कावळे, संदीप बडवाण्णाचे, गणेश गुंडप व स्वरूप मैथी आदी मान्यवरांच्या हस्ते ‘बेळगांव श्री’ विजेत्यास देण्यात येणाऱ्या चषकाचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी किरण कावळे, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, बाळासाहेब काकतकर व चंद्रकांत गुंडकल यांनी मराठा युवक संघाच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला व संघटनेच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. तसेच मराठा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै. एल. आर. पाटील, अप्पासाहेब पवार व चंद्रकांत देवगेकर यांनी केलेल्या योगदानाचाही या चषक अनावरण समारंभात विशेष उल्लेख करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी, मॉडर्न जिमचे सदस्य तसेच मराठा युवक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मुचंडी यांनी केले तर किरण कावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
