बेळगाव : कर्नाटक राज्याच्या स्टार्टअप पॉलिसी 2022–27 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बियॉंड बेंगळुरू – TBI 2.0 उपक्रमात आज बेळगावासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. राज्य सरकार आणि KLE टेक विद्यापीठ, डॉ. एम. एस. शेषगिरी कॅम्पस, बेळगाव यांच्यात तंत्रज्ञान व्यवसाय इनक्युबेटर (Technology Business Incubator) स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoA) करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आयएएस अधिकारी व ITBT चे संचालक तसेच KITS चे व्यवस्थापकीय संचालक श्री राहुल शरणप्पा संकनूर यांनी KAHER व KLE टेक विद्यापीठाला भेट देऊन हितधारकांशी संवाद साधला.
या धोरणाअंतर्गत राज्य सरकारने प्रत्येक इनक्युबेटरसाठी कमाल ₹10 कोटींच्या सहाय्याची तरतूद केली आहे. प्राप्त झालेल्या 39 प्रस्तावांपैकी 11 इनक्युबेटरची निवड करण्यात आली असून त्यामध्ये बेळगावातील KLE टेक विद्यापीठाचाही समावेश आहे.
या करारामुळे बेळगावात नवोपक्रम, उद्योजकता आणि तंत्रज्ञान विकासाला नवे बळ मिळणार असून रोजगार निर्मिती व स्टार्टअप इकोसिस्टमला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.