मराठी व इंग्रजी फलकांवरील दादागिरी थांबवा; महाराष्ट्र एकीकरण समितीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

मराठी व इंग्रजी फलकांवरील दादागिरी थांबवा; महाराष्ट्र एकीकरण समितीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

मराठी व इंग्रजी फलकांवरील दादागिरी थांबवा; महाराष्ट्र एकीकरण समितीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

बेळगाव :
गेल्या काही दिवसांपासून शहरात व परिसरात काही तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून व्यापारी आस्थापनांच्या मराठी व इंग्रजी भाषेतील फलकांवर दादागिरी करून ते झाकणे, काळे रंगवणे किंवा फलक हटवण्याचे प्रकार वाढले आहेत. या बेकायदेशीर कारवायांवर तातडीने प्रतिबंध घालावा, या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बेळगाव शहर पोलिस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनावर कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या स्वाक्षऱ्या असून खानापूर अध्यक्ष गोपाळ देसाई यांनीही सहस्वाक्षरी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून काही कन्नड बळग कार्यकर्ते स्वतःहून कायदा हातात घेऊन व्यापारी फलकांवरील मराठी व इंग्रजी मजकूर पुसत आहेत, ज्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित व्यवसाय परवाने घेऊन कायदेशीरपणे चालवले जात असून त्यांना भारतीय राज्यघटनेने दिलेला व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा दादागिरीला आळा बसणे आवश्यक आहे.

तसेच निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कन्नड भाषा सर्वांगीण विकास अधिनियम २०२२ नुसार सरकारी व स्थानिक संस्थांच्या फलकांवर कन्नड भाषेचा वापर अनिवार्य केला असला तरी या अधिनियमात मराठी किंवा इंग्रजी भाषेचा वापर करण्यास कुठेही मनाई नाही. व्यापारी फलकांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील मजकूर हटवण्याचा अधिकार कोणत्याही कार्यकर्त्यास किंवा संघटनेला दिलेला नाही.

बेळगाव, खानापूर, निपाणी आणि अथणी तालुक्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी हीच व्यवहाराची भाषा असून आजही तीच परंपरा सुरू आहे. मराठी भाषेतील फलक काढून टाकणे हे स्थानिक मराठी भाषिक जनतेच्या भावना दुखावणारे असून, राज्यघटनेतील अल्पसंख्यांक भाषिक हक्कांवर घाला घालणारे आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

या प्रसंगी रणजीत चव्हाण पाटील, दत्त उघाडे, रणजीत हावळणाचे, आर. एम. चौगुले, पियूष हावळ, महेश जुवेकर, अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, गोपाळ पाटील, श्रीकांत कदम, बी. डी. मोहनगेकर, उमेश पाटील, विनायक कावळे, किरण हुद्दार, नेताजी जाधव यांच्यासह समितीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र एकीकरण समितीने पोलिस प्रशासनाला विनंती केली आहे की, अशा बेकायदेशीर कृतींना तातडीने आळा घालावा आणि मराठी व इंग्रजी भाषेतील फलकांवर कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − 5 =

error: Content is protected !!