बेळगाव, ७ ऑगस्ट २०२५ (गुरुवार):
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती , बेळगावच्या सात सदस्यीय शिष्टमंडळाने आज सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील बैठक सभागृहात मा. जिल्हाधिकारी श्री. मोहम्मद रोशन (IAS) यांची भेट घेऊन सीमाभागातील भाषिक अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर चर्चा केली.
शिष्टमंडळात माजी ग्रामीण आमदार मनोहर के. किनेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश ए. मरगाळे, ॲड. एम. जी. पाटील, ॲड. महेश बिरजे, ॲड. अमर के. यळूरकर व जनसंपर्क प्रमुख विकस आर. कलघटगी यांचा समावेश होता.
या बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय, शैक्षणिक व प्रशासकीय पातळीवरील कन्नड सक्ती, मराठी शाळांची घसरण, तसेच स्थानिक प्रशासनाने भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका शिष्टमंडळाने मांडली.
उपजिल्हाधिकारी श्री. रोशन यांनी शिष्टमंडळाच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सदर बैठक मराठी भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार व अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे नमूद केले असून, अशा प्रकारच्या भेटीगाठींमधून प्रशासनाला जागरूक करून सीमाभागातील प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.