अगरबत्ती पॅकिंग व्यवसायाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीविरोधात महिलांचा संताप; साई भवन येथे श्रीराम सेना हिंदूस्थानची बैठक संपन्न
बेळगाव : अगरबत्ती पॅकिंग व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक झालेल्या हजारो महिला भगिनींनी आज साई भवन, जुने बेळगाव येथे झालेल्या बैठकीत सहभागी होऊन आपला रोष व्यक्त केला. या बैठकीत महिलांनी श्री रमाकांत दादा कोंडूसकर, अध्यक्ष – श्रीराम सेना हिंदूस्थान यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
सदर बैठक श्रीराम सेना हिंदूस्थान तर्फे आयोजित करण्यात आली होती. प्रशासनाच्या वतीने शहापूर पोलिस स्थानकाचे निरीक्षक सीपीआय सिद्धाप्पा सीमानी हे उपस्थित होते. प्रशासनाने संबंधित विभागाला या प्रकरणाचा तपास शीघ्र गतीने सुरू ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पी.बी. रोडवरील साई भवन येथे भरवण्यात आलेल्या या बैठकीस हजारो फसवणूक झालेल्या महिला उपस्थित होत्या. बैठकीदरम्यान प्रत्येक महिलेची सविस्तर माहिती घेतली गेली, जेणेकरून सर्वांच्या तक्रारी एकत्रित स्वरूपात शहापूर पोलीस ठाण्यात दाखल करता येतील.
या वेळी रमाकांत कोंडूसकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भामट्यांविरुद्ध श्रीराम सेना हिंदूस्थान तीव्र लढा उभारेल.”
तसेच शहापूर पोलिस स्थानकाचे निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांनीही उपस्थित महिलांना कायदेशीर मार्गदर्शन केले आणि सर्व तक्रारींवर योग्य ती कारवाई होईल असे आश्वासन दिले.
या बैठकीत प्रशांत भातकांडे आणि सुनील बोकडे हेही उपस्थित होते.
एकूणच, या बैठकीतून स्पष्ट झाले की, येत्या काळात अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटविरुद्ध कठोर कारवाई आणि व्यापक आंदोलन उभारले जाईल.
