बेळगाव : सकल मराठा समाज, बेळगाव (१८ पगड जाती व १२ बलुतेदार) यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिवाजी उद्यान येथे मानवंदना व अभिवादनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी बेळगाव व परिसरातील मराठा समाज तसेच मराठी भाषिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. संपूर्ण परिसर छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. 🚩
कार्यक्रमास सकल मराठा समाज बेळगावचे समन्वयक किरण जाधव, ॲड. अमर येळूरकर, गुणवंत पाटील, सागर पाटील, ह.भ.प. शंकर बबली महाराज, सुनील बोकडे, सुनील जाधव, राजन जाधव, महादेव पाटील, महिला आघाडी प्रमुख रेणूताई किल्लेकर, भातखंडे, विपुल जाधव, सचिन पाटील तसेच असंख्य समाज बांधव-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान समन्वयक किरण जाधव यांनी शासनाकडे ठाम मागणी करत सांगितले की, बेळगाव व परिसरात बहुसंख्य मराठा समाज व मराठी भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे शासकीय शिवजयंती मराठा समाजाच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन साजरी करण्यात यावी. यावर बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील वर्षापासून १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मराठा समाजाच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन साजरी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
महिला आघाडी प्रमुख रेणूताई किल्लेकर यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवरायांचे चरित्र व विचार प्रत्येकाने अंगीकारले पाहिजेत, असे प्रतिपादन केले. शिवरायांचे आदर्श आचरणात आणल्यासच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल, असे त्यांनी नमूद केले.
समन्वयक गुणवंत पाटील यांनी प्रत्येक घरामध्ये शिवचरित्र असणे आवश्यक असल्याचे सांगत, जीवनातील प्रत्येक प्रसंगात शिवरायांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे, असे आवाहन केले.
महादेव पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय केला. उपस्थित समाजप्रमुखांनीही आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. 🚩
