कांग्रळी (ता. बेळगाव) : “देश मला काय देतो यापेक्षा मी देशाला काय दिले पाहिजे” या विचाराने प्रेरित होऊन डॉ. श्रीनानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने कांग्रळी गावात भव्य स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.
प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. संपूर्ण भारतभर सुरू असलेल्या या स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून कंग्राळी गाव व मार्कंडेय नदी परिसराची व्यापक स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात बेळगाव, हिंडलगा, देसूर आदी भागांतील श्री सदस्य स्वतःच्या खर्चाने व स्वयंप्रेरणेने सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने उपस्थित स्वयंसेवकांनी गाव परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व नदीकिनारा स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
प्रतिष्ठानचे संस्थापक महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांनी ८ ऑक्टोबर १९४३ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सामाजिक प्रबोधनाचा पाया रचला. समाजातील अज्ञान दूर करून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा त्यांचा वारसा पुढे नेत २०१० साली पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठानची स्थापना केली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेतून कार्य करणारे हे प्रतिष्ठान सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, भूजल पुनर्भरण, रक्तदान, आरोग्य शिबिरे, निर्माल्य संकलन, प्रौढ साक्षरता तसेच ई-वेस्ट रिसायकलिंग यांसारख्या सुमारे ४६ क्षेत्रांत कार्यरत आहे.
स्वच्छता अभियानाद्वारे प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करत संपूर्ण परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. “ज्या क्षेत्रात समाजाला गरज आहे त्या क्षेत्रात प्रतिष्ठान कार्यरत आहे,” असे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कंग्राळी ग्रामपंचायतीने दिलेल्या सहकार्याबद्दल व उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी व ग्रामस्थांचे प्रतिष्ठानतर्फे आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश समाजात पोहोचला.
