बेळगाव / प्रतिनिधी :
मराठी विद्यानिकेतनतर्फे शिक्षक, पालक व नागरिकांसाठी जाहीर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्याने गुरुवार दि. २९ व शुक्रवार दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून ‘विवेकी पालकत्व’ आणि ‘आधुनिक जगातील डिजिटल आव्हाने’ या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
गुरुवार दि. २९ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांची ‘विवेकी पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शनपर मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर हे परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्ते असून विवेकवाहिनी व मानसरंग या कार्यक्रमांचे मुख्य समन्वयक व संयोजक आहेत. तसेच ते साधना ट्रस्ट व प्राज्ञपाठशाळा, वाई या संस्थांचे विश्वस्त असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत. ‘प्रश्न मनाचे’ या पुस्तकाचे त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत सहलेखन केले असून मानसिक आरोग्य व व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात परिवर्तन संस्थेमार्फत ते अनेक वर्षे सक्रिय कार्य करत आहेत.
शुक्रवार दि. ३० जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सायबर पत्रकार मुक्ता चैतन्य यांचे ‘आधुनिक जगातील डिजिटल आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. मुक्ता चैतन्य या मराठीतील पहिल्या सायबर पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. सायबर व डिजिटल क्षेत्रातील प्रबोधनात्मक लेखन व कार्य करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील मोजक्या तज्ज्ञांपैकी एक असून ‘सायबर पालकत्व’ या विषयावर त्या कार्यशाळा घेतात. तसेच डिजिटल व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र स्थापन करून समुपदेशन व मार्गदर्शनाचे कार्यही त्या करीत आहेत.
ही दोन्ही व्याख्याने सर्वांसाठी खुली असून जास्तीत जास्त सुजाण नागरिकांनी, शिक्षकांनी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी विद्यानिकेतनचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.
