बेळगाव :
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तसेच सीमाभागातील मराठी भाषेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी सन्मान यात्रेला’ रविवार दि. १५ मार्च रोजी प्रारंभ होत आहे. या यात्रेचा पहिला टप्पा दुपारी ठीक ४ वाजता राजहंसगड ते येळ्ळूर असा होणार असून, या यात्रेत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या भाषिक अन्यायाच्या पार्श्वभूमीवर ही मराठी सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सीमाभागात मराठी भाषेवर भाषिक अत्याचार होत असल्याचा आरोप करत, भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मिळणारे हक्क वारंवार डावलले जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. भाषिक अल्पसंख्याक आयोगाने अनेकदा सूचना करूनही त्या सूचनांकडे कर्नाटक सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचेही सांगण्यात आले.
याशिवाय सीमाभागातील सार्वजनिक ठिकाणांवरील फलकांचे कानडीकरण केले जात असल्याची तसेच सरकारी कागदपत्रे प्रामुख्याने कानडी भाषेत असल्याने मराठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी जनता एकत्र येऊन सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आवाज बुलंद करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे.
सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा या मागणीसाठी गेली जवळपास ६९ वर्षे मराठी भाषिकांचा लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे. या लढ्यालाच बळ देण्यासाठी आणि मराठी जनतेला एकत्रित करण्यासाठी मराठी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ती यशस्वी करणे काळाची गरज असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या मराठी सन्मान यात्रेमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण घटक समितीचे सदस्य, युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, मोनाप्पा पाटील आणि विठ्ठल पाटील यांनी केले आहे.
