मराठा मंदिर येथे १ मार्च रोजी युवा समिती तर्फे मराठी भाषा गौरव दिन; बक्षीस वितरण व आदर्श शाळा पुरस्कार सोहळा

मराठा मंदिर येथे १ मार्च रोजी युवा समिती तर्फे मराठी भाषा गौरव दिन; बक्षीस वितरण व आदर्श शाळा पुरस्कार सोहळा

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने १ मार्च २०२६ रोजी मराठा मंदिर येथे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा, आदर्श मराठी शाळा पुरस्कार वितरण आणि मराठी भाषा गौरव दिन सोहळा पार पडणार आहे.

या संदर्भात समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शनिवार दि. १४ रोजी युवा समिती कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्राचे पूर्व उपमुख्यमंत्री यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी सांगितले की, मागील महिन्यात पार पडलेल्या भव्य सामान्यज्ञान स्पर्धेत जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली होती. या स्पर्धेतील चार गटांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा १ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे मराठी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव व खानापूर तालुक्यातील पाच शाळांना ‘आदर्श मराठी शाळा’ पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यंदा २१ शाळांनी अर्ज केले असून पुढील आठवड्यात विजेत्या शाळांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच २०२४-२५ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या तिन्ही शैक्षणिक विभागांतील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धक, शिक्षक, विद्यार्थी व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीस कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासु सामजी, राजू कदम, विनायक कावळे (खजिनदार), किरण हूद्दार, महांतेश आलगोंडी, सुरज कुडुचकर, प्रतीक पाटील, आकाश भेकणे, सौरभ तोंडले, अश्वजीत चौधरी, अक्षय बांबरकर, प्रवीण धामणेकर, निखिल देसाई, आशिष कोचेरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकांत कदम यांनी केले.


▪ आवाहन

२०२४-२५ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या तिन्ही शैक्षणिक विभागांतील पहिल्या तीन अव्वल विद्यार्थ्यांचा दरवर्षीप्रमाणे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी सरचिटणीस श्रीकांत कदम (मो. ७०१९६६८०२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − four =

error: Content is protected !!