राजहंसगड येथे मराठी भाषा दिनानिमित्त अभिवादन; धामणे व येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपस्थितीचे आवाहन

राजहंसगड येथे मराठी भाषा दिनानिमित्त अभिवादन; धामणे व येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपस्थितीचे आवाहन

बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने राजहंसगड येथे शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन तसेच ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे.

धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी सीमाभागातील मराठी बांधवांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीनेही या कार्यक्रमाला सक्रिय पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. येळ्ळूर समितीचे श्री. वामनराव रवळू पाटील (माजी एपीएमसी सदस्य) यांनी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी भाषा दिनाचे औचित्य साधावे, असे आवाहन केले आहे.

राजहंसगडावर होणाऱ्या या कार्यक्रमातून मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत शिवरायांना व कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यात येणार असून सीमाभागातील मराठी एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − fifteen =

error: Content is protected !!