गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचा मराठी भाषा दिन उत्साहात साजरा; मातृभाषेतून शिक्षणाची गरज अधोरेखित

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचा मराठी भाषा दिन उत्साहात साजरा; मातृभाषेतून शिक्षणाची गरज अधोरेखित

बेळगाव येथे गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोगटे रंगमंदिर, स्कूल ऑफ कल्चर येथे आयोजित या कार्यक्रमाला मराठी भाषा प्रेमी नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रबोधिनीचे सदस्य व नाट्यकर्मी अनंत जांगळे यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्री इंद्रजित मोरे यांनी शोकप्रस्ताव मांडून जांगळे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ या परिसंवादाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात बेळगावचे उद्योजक सोनाली व जयदीप बिर्जे, सीए ओंकार सुतार व अक्षता सुतार तसेच युवा उद्योजक राहुल व अक्षता पाटील या दांपत्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ ही लघुनाटिका सादर करण्यात आली. मराठी विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थिनी अंकिता कदम व शिवानी गायकवाड यांनी प्रभावी अभिनय सादर केला. प्रसाद सावंत यांनी या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन केले होते.

यानंतर संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘उषःकाल होता होता’ तसेच कवी नारायण सुर्वे यांचे ‘डोंगरी शेतमाझे’ हे गीत सादर केले. नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या गीतातून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री सुभाष ओऊळकर यांनी केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दोन विशेष सत्कारही करण्यात आले. बेळगाव येथील जीएसटी विभागाचे जॉईंट कमिशनर आय.आर.एस. आकाश चौगुले तसेच कॉन्टॉनमेंट बोर्डचे सीईओ सुदाम मंचलवार यांचा मातृभाषेतून शिक्षणाच्या प्रसारासाठी सन्मान करण्यात आला. या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून त्यांची मुलेही सध्या मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ या परिसंवादात श्रीमती सविता पवार व नीला आपटे यांनी जयदीप व सोनाली बिर्जे, अक्षता व राहुल पाटील तसेच अक्षता व ओंकार सुतार यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासाविषयी सविस्तर संवाद साधण्यात आला. मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे मिळालेले आत्मविश्वास, भाषिक भक्कम पाया, व्यावसायिक क्षेत्रातील संधी, तसेच मराठी माध्यमाविषयी असलेले गैरसमज व न्यूनगंड याबाबत त्यांनी मनमोकळेपणाने अनुभव मांडले. “मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो,” असा ठाम संदेश सर्व मान्यवरांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाला प्राचार्य आनंद मेणसे, बाळाराम पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, डॉ. पी. डी. काळे, शंकर चौगुले, किरण पाटील, प्रा. सुरेश पाटील, अशोक जांभळे, विजय बोंगाळे यांच्यासह बेळगावमधील मराठी भाषा प्रेमी नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व मराठी विद्यानिकेतनचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंकिता कदम व शिवानी गायकवाड यांनी प्रभावीपणे पार पाडले. मातृभाषेबद्दल अभिमान जागवणारा आणि मराठी माध्यमाच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + 10 =

error: Content is protected !!