जिद्द असेल तरच यशस्वी वाटा सापडतात – प्राचार्य अरविंद पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शनमराठा समाज सुधारणा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

जिद्द असेल तरच यशस्वी वाटा सापडतात – प्राचार्य अरविंद पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शनमराठा समाज सुधारणा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

बेळगाव | 13 जुलै 2025

जिद्द नसेल तर हजारो पळवाटा असतात, पण विद्यार्थ्यांनी पळवाटा नव्हे तर यशस्वी वाटा शोधाव्यात,” असे स्पष्ट व प्रेरणादायी प्रतिपादन खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळ, बेळगाव यांच्यातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

हा कौतुक सोहळा मराठा मंदिर, बेळगाव येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. तर व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, दीपक किल्लेकर, संग्राम गोडसे, शितल वेसणे व खजिनदार के. एल. मजूकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपल्या अपयशाचे खापर परिस्थितीवर फोडू नये. न्यूनगंड बाजूला ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर कोणतीही परिस्थिती जिंकता येते. स्वप्न पाहणं थांबवू नका, कारण स्वप्न संपली की वाट संपते.”

या सोहळ्यात १०वी आणि १२वीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या १६५ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यामध्ये १०वीतील – निधी कंग्रालकर, वेदिका मुचंडी, प्रियंका मरग्गी, युक्ती देसाई, अन्वी पाटील, ऐश्वर्या माणकोजी, प्रसाद मोलेराखी, साधना कुगजी
आणि १२वीतील – तन्वी पाटील, सृष्टी आपटेकर, श्रावणी पाटील, अथर्व गौडाडकर, श्वेता बालेकुद्रीकर, आसावरी पाटील यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन प्राचार्य अरविंद पाटील यांच्या हस्ते, तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तसबिरीचे पूजन दीपक किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन के. एल. मजूकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहचिटणीस संग्राम गोडसे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजू पावले, ईश्वर लगाडे, प्रकाश गडकरी आणि कविता देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी विद्यार्थी, पालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 2 =

error: Content is protected !!