बेळगाव : आधुनिक जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे विवाहपद्धतीत मोठी परिवर्तनाची लाट आली आहे. शिक्षण क्षेत्रात मुलींची भरीव प्रगती होत असताना मुलांमध्ये उच्चशिक्षणाचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजात योग्य वयात मुला-मुलींचे विवाह जुळवणे पालकांसाठी मोठे आव्हान बनले असून, वधू-वर परिचय मेळावे ही काळाची अनिवार्य गरज बनली असल्याचे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले.
यासाठी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २१ डिसेंबर रोजी, रूपाली कन्व्हेन्शन सेंटर, जुना धारवाड रोड, बेळगाव येथे भव्य वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. सरनोबत यांनी सांगितले की, आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि श्रमजीवी कुटुंबातील अनेक तरुणांचे विवाह जुळणे कठीण झाले आहे. मुलींची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती महानगरांपासून आयटी, बँकिंग आणि विविध क्षेत्रांत होत आहे; मात्र अनेक तरुण पारंपरिक व्यवसाय, नोकरी किंवा शेतीपुरते मर्यादित असल्याने विवाह जुळविताना दरी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यामुळे समाजातील विवाहाच्या प्रश्नांवर संघटित प्रयत्नांची आवश्यकता निर्माण झाली आहे. “वधू-वर मेळाव्यामुळे समाज एकत्र येतो, अनेकांच्या गाठीभेटी होतात आणि तरुण पिढीत सुसंवाद वाढीस लागतो. सर्वांचे विवाह एकाचवेळी जुळले नाहीत तरीही समाज बांधणीसाठी हे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे सरनोबत म्हणाल्या.
आज विवाह जुळल्यानंतरही अनेक जोडपी घटस्फोटासारख्या समस्यांना सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले. पती-पत्नीतील संवाद, परस्परांना समजून घेणे आणि आपुलकी यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “सुखी संसारासाठी संस्कार अनिवार्य आहेत. मुलांच्या विचारांवर सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव आहे, त्यामुळे पालकांनी मुलांवर योग्य संस्कार करणेच खरी श्रीमंती आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्याच्या माध्यमातून तरुण-तरुणी व पालकांमध्ये संवाद साधला जाईल, समाज एकत्र येऊन प्रगतीची वाट मोकळी करेल, असा विश्वास सरनोबत यांनी व्यक्त केला.
मराठा समाज बांधवांनी या वधू-वर मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
