निपाणी : मराठा व्यवसाय संघ, निपाणी (भारत) यांचा १० वा वर्धापन दिन सोहळा रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, निपाणी येथे उत्साहात आणि मोठ्या सहभागात पार पडला. या सोहळ्यास संघाचे सदस्य, उद्योजक, व्यापारी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ९ वाजता स्वागत व सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शिवपूजन व शिवगर्जना करण्यात आली. संघाच्या वाटचालीचा आढावा घेत मराठा व्यवसाय संघाची माहिती, आजपर्यंतच्या कार्याचा आढावा, तसेच अॅडमिन व कार्यकारिणी टीमची ओळख करून देण्यात आली.
यानंतर “व्यवसायवृद्धी आणि आत्मनिर्भरता” या विषयावर प्रसिद्ध वक्ते व व्यवसाय मार्गदर्शक मा. श्री. रविंद्र खेर सर (कोल्हापूर) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक व्यवसायातील संधी, बदलती बाजारपेठ, नवउद्योजकांनी घ्यावयाची दिशा तसेच संघटनेच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी कशी साधता येईल यावर सखोल विचार मांडले.
दुपारी यशस्वी उद्योजक व संघाला सतत सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आभार प्रदर्शन झाले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह भोजन, विविध व्यावसायिक प्रदर्शन तसेच खरेदी-विक्रीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यास उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
या वर्धापन दिन सोहळ्याच्या माध्यमातून व्यावसायिकांमध्ये एकजूट, आत्मनिर्भरतेची जाणीव आणि नव्या संधींबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा व्यवसाय संघ, निपाणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
