प्राथमिक तपासात पोलिसांनी जप्त केलेली दारू सुमारे 7000 लिटर इतकी असून बाजारभावानुसार तिची किंमत जवळपास 25 ते 30 लाख रुपये इतकी किंवा त्याहून जास्त होते. याप्रकरणी सध्या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या दारूचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून या दारूची निर्मिती नेमकी कोठे केली गेली? ती कुठून आणली जात होती? याचा तपास केला जाणार आहे. त्याचप्रमाणे इतका मोठा बेकायदेशीर दारू साठा जप्त करण्याची प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर आणि त्यांच्या पथकाला रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.
मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे करण्यात आलेली गेल्या महिन्याभरातील ही तिसरी मोठी पोलीस कारवाई आहे अशी माहिती देऊन आमची लोकांना विनंती आहे की त्यांना त्यांच्या आसपास एखादे बेकायदेशीर कृत्य किंवा संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, जेणेकरून संबंधित गोष्टींना आळा घालता येईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शेवटी म्हणाले. पत्रकार परिषदेत प्रसंगी पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
