बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध नामांकित कंपन्यांच्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या एका आरोपीस माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. अमेझॉन कंपनीत अधिकृत वितरक म्हणून कार्यरत असलेले प्रविण पद्मराज तडसद, रा. जमखंडी, जि. बागलकोट यांनी दिनांक 04 जानेवारी 2026 रोजी माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, दिनांक 14 जून 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीत बेळगाव ऑटो नगर परिसरात अमेझॉन तसेच इतर विविध कंपन्यांच्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीस गेल्या होत्या.
या प्रकरणाचा तपास माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी), मार्केट उपविभाग, बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला. सखोल तपासानंतर यापूर्वी संबंधित कंपनीत काम करत असलेला शुभम शशिकांत दिंडे (वय 29), रा. शिवाजी नगर, सेकंड मेन, बेळगाव यास दिनांक 05 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी विविध कंपन्यांचे 18 स्मार्ट मोबाईल फोन, 01 टॅब, 05 स्मार्ट वॉच, 01 गिंबल स्टॅबिलायझर तसेच एअरपॉड्स व हेडफोन्स असा एकूण ₹4,49,321/- किमतीचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाईत पोलीस निरीक्षक श्री बी. आर. गड्डेकर, पीएसआय श्री होन्नप्पा तलवार, पीएसआय श्री श्रीशैल हुलेगेरि, पीएसआय श्री उदय पाटील, पीएसआय श्री पी. एम. मोहिते यांच्यासह माळमारुती पोलीस ठाणे, बेळगाव येथील अधिकारी व कर्मचारी — श्री बी. एफ. बसवाड, श्री एम. जी. कुरेगर, श्री मुत्तप्पा बोम्मनाळ, श्री अरुण कांबळे, श्री जगन्नाथ भोसले, श्री बी. एम. कल्लप्पनवर, श्री सी. जे. चिन्नप्पगोल, श्री के. बी. गौडाणी, श्री सी. एल. गिरी, श्री महेश ओडेर, श्री मल्लिकार्जुन गाडवी तसेच तांत्रिक विभागातील कर्मचारी श्री रमेश अक्की व श्री महादेव कासीद यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल बेळगावचे माननीय पोलीस आयुक्त यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.
