नवी दिल्ली : महाराष्ट्र–कर्नाटक सीमा प्रश्नाची बहुप्रतिक्षित सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज, २१ तारखेला हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर मेंशन करण्यात येणार होता. मात्र, तो अपेक्षेप्रमाणे दाखल होऊ शकला नाही.
आज सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांचे वेगळे बेंच बसल्याची माहिती समोर आली आहे. सीमा प्रश्नाचा खटला ज्या न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर येणार होता, ते बेंच आज कार्यरत नसल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. परिणामी, सीमा प्रश्नाच्या खटल्याची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.
एडवोकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव आणि ज्येष्ठ वकील वैद्यनाथन यांनी तीन न्यायाधीशांचे बेंच निर्माण करून दावा ताबडतोब सुनावरणीस घ्यावा अशा प्रकारचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.
सीमा भागातील मराठी भाषिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या खटल्याच्या सुनावणीची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, वारंवार होणाऱ्या तारखांच्या बदलामुळे आणि सुनावणी पुढे ढकलल्या जात असल्यामुळे सीमावासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाला नवी तारीख कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
