स्मशानातील महाशिवरात्र; २८ वर्षांपासून आगळावेगळा उपक्रम

स्मशानातील महाशिवरात्र; २८ वर्षांपासून आगळावेगळा उपक्रम

बेळगाव – हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. देशभरात हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो; मात्र स्मशानभूमीत महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी केली जाते, हे निश्चितच वेगळेपण ठरते. शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत गेल्या २८ वर्षांपासून हा अनोखा उपक्रम राबविला जात असून, यामागे यांचे सातत्यपूर्ण कार्य आहे.

सालाबादाप्रमाणे यंदाही रविवार, १५ फेब्रुवारी रोजी मुक्तिधाम महाशिवरात्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे शिवमंदिरात अभिषेक, महापूजा, आरती व प्रसाद वाटप होणार असून शहापूर भारतनगर येथील श्री भक्ती महिला भजनी मंडळाचा भजन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. कोरोना काळानंतर महाप्रसाद कार्यक्रम बंद ठेवण्यात आला असला तरी उपवास करणाऱ्या भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, फळे आदी फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.

सामान्यतः स्मशानभूमीत केवळ अंत्यविधीसाठीच लोक जातात; परंतु शहापूर मुक्तिधामने ही मानसिकता बदलली आहे. सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ओसाड अवस्थेतील या स्मशानभूमीचे रूपांतर नंदनवनात करण्याचा संकल्प केला. स्वच्छता, सुशोभीकरण आणि धार्मिक वातावरण निर्मितीसाठी शिवमंदिर उभारण्यात आले. तेव्हापासून येथे नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळ पूजाअर्चा केली जाते आणि महिला-पुरुष भाविक बिनधास्तपणे दर्शनासाठी उपस्थित राहतात—हेच या शिवमंदिराचे वैशिष्ट्य ठरले आहे.

मंडळाच्या पुढाकारातून केवळ महाशिवरात्र उत्सवच नव्हे तर विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत. गरीब कुटुंबांतील मृतांचे स्वखर्चाने अंत्यसंस्कार, अंत्यदाहिनी उभारणी, माफक दरात लाकडाची व्यवस्था यामुळे अंत्यसंस्काराचा खर्च कमी झाला आहे. गरिबांचे विवाह, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छतागृह बांधकाम, पाण्याची टाकी व नळ व्यवस्था, पेव्हर ब्लॉक्स व बसण्यासाठी निवाऱ्याची सोय अशा अनेक विकासकामांत विविध संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे आर्थिक देणगीऐवजी साहित्यरूपाने मदत स्वीकारण्याची भूमिका मंडळाने कायम ठेवली आहे.

बेळगाव महापालिकेचे अपेक्षित सहकार्य नसतानाही केवळ सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणारे हे कार्य उल्लेखनीय आहे. स्मशानभूमीबाबतची भीती आणि नकारात्मक मानसिकता बदलण्याचा प्रयत्न मंडळाने आपल्या सेवाभावी कार्यातून यशस्वी केला आहे. शहरातील तसेच इतर स्मशानभूमींनाही हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून, शहापूर मुक्तिधाम येथील महाशिवरात्र सोहळा दरवर्षी बेळगावकरांसाठी औत्सुक्याचा विषय बनला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − 4 =

error: Content is protected !!