बेळगाव : मराठी हक्कासाठी पुन्हा वज्रमूठ! मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची निर्धारपूर्ण बैठक संपन्न
बेळगाव – मराठींच्या हक्कासाठी झगडणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी मराठा मंदिर येथे संपन्न झाली. दुपारी 3.30 वाजता सुरू झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते. कर्नाटक सरकार दरवर्षी बेळगावमध्ये आपले हिवाळी अधिवेशन घेते, त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी भाषिकांचा महामेळावा भरविला जातो. यंदाही ८ डिसेंबर रोजी कर्नाटक अधिवेशन होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर पुढील रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीस मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण पाटील, एम. जी. पाटील, आबासाहेब दळवी, आर. एम. चौगुले, नेताजी जाधव, रामचंद्र मोदगेकर, राजू मरवे यांसह अनेक सदस्य उपस्थित होते. मालोजीराव अष्टेकर यांनी मागील ठरावांचे वाचन केले तर प्रकाश मरगाळे यांनी त्या अनुषंगाने झालेल्या कामाचा आढावा घेतला. समितीच्या सदस्यांनी एकत्रितपणेच भेटीगाठी घेण्याचे, वेगळे गट निर्माण न करण्याचे सुचविण्यात आले. तसेच इंग्रजी फलकांवरील नुकत्याच झालेल्या दगडफेकीबाबत पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली व पोलिस प्रशासन तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र शासन यावेळी बघ्याची भूमिका घेत असल्याची नाराजी व्यक्त करत महामेळाव्याच्या पार्श्वभूमीचा आढावा घेतला. एम. जी. पाटील यांनी हुतात्मा स्मारकासंबंधी माहिती देत मेळावा यशस्वी करण्यावर भर दिला. आर. एम. चौगुले यांनी मराठी शाळांमध्ये कन्नड शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध केला. नेताजी जाधव यांनी ठामपणे सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत महामेळावा झाला पाहिजे.
रामचंद्र मोदगेकर यांनी महापालिका आयुक्तांनी व्यावसायिक आस्थापनांवरील फलकांना रंग लावल्याबद्दल निषेध व्यक्त केला. मालोजीराव अष्टेकर यांनी परवानगी संदर्भातील अडथळ्यांचा पूर्वानुभव मांडत समितीच्या कामकाजात गुप्तता राखण्याची सूचना केली. मनोहर हुंदरे यांनी वेदिकेच्या दादागिरीबाबत उपाययोजना करावी असे सुचविले.
बैठकीच्या शेवटी अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी ठामपणे सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत महामेळावा ८ डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी महाराज चौकात होणारच. “१ नोव्हेंबरप्रमाणे पुन्हा मराठी जनतेने आपली वज्रमूठ दाखवावी, अटक झाली तरी पोलिसांची कुमक कमी पडेल इतक्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच ११ नोव्हेंबर, मंगळवारी सकाळी ११ वाजता पोलिस आयुक्तांना परवानगीसाठी व कर्नाटक रक्षण वेदिकेच्या गुंडगिरीबाबत निवेदन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या निर्णायक बैठकीस उपस्थित होते —
मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण पाटील, एम. जी. पाटील, आबासाहेब दळवी, आर. एम. चौगुले, नेताजी जाधव, रामचंद्र मोदगेकर, राजू मरवे, पियूष हावळ, रावजी पाटील, मुरलीधर पाटील, बी. बी. देसाई, राजाराम देसाई, मोनापा पाटील, मोहनगेकर, अनिल पाटील, मनोहर हुंदरे आदी मान्यवर सदस्य.
#Belgav #BedhadakBelgav
