बेळगाव :
डाएट बेळगाव येथे शासकीय प्रौढशाळा सहाय्यक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसांच्या पुनर्सिंचन, ज्ञान सेतू, पॉक्सो व व्यावसायिक मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सोमवारी (दि. 19 जानेवारी 2026) ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा बेळगाव जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव मा. श्री. संदीप पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मा. पाटील यांनी पॉक्सो कायदा व बालकांवरील शारीरिक शिक्षेच्या प्रतिबंधाबाबत शिक्षकांना सविस्तर कायदेशीर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “मुलांना शारीरिक शिक्षा न देता त्यांच्या मनावर जिंकणारे शिक्षक बनल्यास त्यांना अभ्यासाकडे वळवणे अधिक सोपे होते. शिक्षकांनी मुलांच्या मनावर विश्वास निर्माण केला, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

यानंतर आपल्या अनुभवांवर आधारित सहज, ओघवत्या कन्नड कथा व वचनांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांना कायद्याची प्रभावी माहिती दिली.
प्रस्ताविकात डाएटचे प्राचार्य श्री. अशोक शिंदगी यांनी मा. न्यायाधीशांच्या सामाजिक जाणिवेचा उल्लेख करत शिक्षकांनी जबाबदारीने व तन्मयतेने कार्य करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात प्रशिक्षण नोडल अधिकारी तथा डाएटच्या व्याख्याता श्रीमती राजश्री नायक यांनी आमंत्रण स्वीकारून उपस्थित राहिल्याबद्दल मा. न्यायाधीशांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅम्प सीआरपी बसवराज कंबार यांनी केले, तर श्रीमती छायाभजंत्री यांनी स्वागत केले.
या कार्यशाळेमुळे प्रौढशाळा सहाय्यक शिक्षकांना कायद्याबाबत सखोल समज मिळाल्याचे सहभागी शिक्षकांनी सांगितले.
