बसूर्ते आणि अतवाड गावांतील शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा नाही; कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे ३० ऑक्टोबरला आंदोलन
बेळगाव: बसूर्ते आणि अतवाड गावांतील शेतकऱ्यांना सरकारकडून गेल्या १४ वर्षांपासूनही कोणतीही भरपाई मिळालेली नाही. या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार आंदोलने, मागण्या करण्यात आल्या असूनही शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.
या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेतर्फे ३० ऑक्टोबर (गुरुवार) रोजी दुपारी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आणि निवेदन सादरीकरण करण्यात येणार आहे.
संघटनेच्या मते, बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने आणि राज्य सरकार यांनी अद्याप ऊस दर निश्चित केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लागू असलेल्या दराप्रमाणेच कर्नाटकातही समान ऊस दर घोषित करावा, अशी संघटनेची ठाम मागणी आहे.
तसेच, बसूर्ते व अतवाड गावातील शेतकऱ्यांची जमीन सरकारने अधिग्रहित करूनही त्यांना अद्याप योग्य भरपाई मिळालेली नाही. या दोन प्रमुख मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश परगण्णवर यांनी इशारा दिला आहे की, सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ३० ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून सरकारला जागे करण्यात येईल.
