बेळगाव ग्रामीणच्या आमदार तथा महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त बेनकनहळी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ७० वर्षांहून अधिक वयाच्या सुमारे १४ हजार ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, आपल्या वाढदिवसानिमित्त इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांमुळे त्या भारावून गेल्या आहेत. ज्येष्ठांचा आशीर्वाद हीच आपली खरी ताकद असून, त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे काम करण्याची ऊर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध सरकारी योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्येक गरजू ज्येष्ठांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी ज्येष्ठांचा आणि आपल्या आई-वडिलांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठांचे अनुभव हे समाजाचे मार्गदर्शन असते, त्यामुळे त्यांच्या विचारांना महत्त्व द्या आणि त्यांची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात विधानपरिषद आमदार चन्नराज हट्टीहोळी तसेच मृणाल हेब्बाळकर यांनीही सक्रिय सहभाग घेतला. काँग्रेसचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भव्य हार घालून लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला असून शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.
सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे उपक्रम आणि ज्येष्ठ व नागरिकांसाठी आयोजित विविध खेळांमुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
